चेन्नई- अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत. आता अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच पीआरएल या संस्थेतील संशोधकांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर आहे.
अहमदाबादच्या संशोधकांनी शोधलेल्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 27 पट आहे तर या ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या सहापट आहे. या संशोधकांच्या मते हा ग्रह सूर्याच्या भोवती एखाद्या ताऱ्याप्रमाणे फिरत आहे असे पीआरएलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.माऊंट अबू येथील गुरुशिखर येथील 1.2 मी दुर्बिण आणि भारतीय बनावटीच्या पीआरएव अॅडव्हान्स रॅडिकल वेलॉसिटी अबू स्काय सर्च म्हणजेच पारस या स्पेक्टोग्राफ या दोन्हींच्या मदतीने हा शोध लावला आहे. हा शोध लावल्यामुळे ग्रह शोधणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. या ग्रहाचे नाव एपिक 211945201 किंवा के2-236 असे नाव आहे. या ग्रहाचे तापमान 600 अंश सेल्सियस इतके असून एखाद्या तप्त ताऱ्याप्रमाणे त्याचे तापमान आहे. तो त्याच्या जवळच्या ताऱ्यापेक्षा लात पट मोठा आहे. त्याच्यावर अधिवास शक्य नाही.