Maldives, Indian Soldiers: मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी संसदेत सांगितले की, भारत सरकार १० मे पर्यंत मालदीवमधून आपले सर्व लष्करी जवान हटवणार आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीयसैनिक तेथे तैनात आहेत. पण आता त्यांना हटवले जाणार असून त्यांची जागा दुसरेच कोणी तरी घेणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल.
मुइज्जू यांनी संसदेत भारतीय सैनिकांविरोधात सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की भारत सरकार १० मे पर्यंत मालदीवमधून सैनिक हटवेल, कारण मालदीवमध्ये भारतीय सैनिकांची उपस्थिती हा दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा आहे. भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान भेट दिले आहे. ते मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वापरले जातात. सुमारे ८० भारतीय सैनिक मालदीवमध्ये हेलिकॉप्टर आणि विमानांच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी तैनात आहेत. पण आता ते हटवले जाणार आहे.
भारतीय जवानांची जागा कोण घेणार?
भारतीय जवानांची जागा कोण घेणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सैनिकांच्या जागी सिव्हिल ऑपरेटर किंवा माजी सैनिक तैनात केले जाऊ शकतात. असे सांगण्यात येत आहे की मुइज्जू सरकारने आपल्या देशात तैनात केलेले लोक सक्रिय सेवेत नसावेत यावर सहमती दर्शविली आहे. 'जेव्हा सेवा देणारा सैनिक त्याच्या स्वत:च्या देशात पोस्ट केला जातो तेव्हा एक नैसर्गिक चिंता असते. मात्र, निवृत्त अधिकारी, तटरक्षक दल किंवा इतर निमलष्करी दलाच्या बाबतीत बाब वेगळी असते', असे काही जाणकारांचे मत आहे.
उच्चस्तरीय कोअर ग्रुपच्या बैठकीत काय घडलं?
गेल्या शुक्रवारी (२ फेब्रुवारी) भारत-मालदीव उच्चस्तरीय कोअर ग्रुपची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीनंतर मालदीवच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारताने तिन्ही विमानचालन प्लॅटफॉर्मवरून आपले सैन्य हटवण्याचे मान्य केले आहे. प्रेस रिलीझनुसार, लष्करी जवानांची १० मार्चपर्यंत एका प्लॅटफॉर्मवरून आणि १० मे पर्यंत उर्वरित दोन प्लॅटफॉर्मवरून 'बदली' केली जाईल. भारत सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मात्र सैन्य हटवण्याबाबत कोणताही उल्लेख नव्हता.
मालदीवमधील लोकांना मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवा पुरवणाऱ्या भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्मच्या संचालनासाठी व्यावहारिक उपायांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक मालदीवची राजधानी माले येथे होणार असल्याचे मान्य करण्यात आले.