वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अमेरिकी विद्यार्थ्याने प्रतिष्ठेचा ‘अमेरिकाज् टॉप यंग सायन्टिस्ट’ (अमेरिकेचा प्रमुख युवा वैज्ञानिक) पुरस्कार पटकावला आहे. घरगुती वापरासाठी वीज पुरवताना कार्बन उत्सर्जन कमी करणारे पर्यावरणपूरक उपकरण विकसित केल्याबद्दल त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली.साहिल दोशी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पीट्सबर्ग येथील रहिवासी असलेल्या साहिलने या पुरस्कारासाठी इतर नऊ विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा केली. त्याला २०१४ डिस्कव्हरी एज्युकेशन ३ एम यंग सायन्टिस्ट चॅलेंजचा विजेता घोषित करण्यात आले.पुरस्कारात २५ हजार डॉलरच्या रोख रकमेसह कोस्टारिकासारख्या ठिकाणी विद्यार्थी साहस सहलीचा समावेश आहे. साहिलने तयार केलेले पोल्लुसेल हे उपकरण कार्बन डाय आॅक्साईडला विजेत रूपांतरित करते. हे उपकरण घरगुती वापरासाठी विजेचा पुरवठा करतानाच कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करते, असे डिस्कव्हरी एज्युकेशन अँड ३ एमने निवेदनात म्हटले आहे. विजेपासून वंचित असलेले जगभरातील १.२ अब्ज नागरिक आणि विषारी हवाई प्रदूषणाची वाढती पातळी यापासून प्रेरणा घेत साहिलने कार्बनचे कमी उत्सर्जन व गरजूंसाठी वीजनिर्मिती करू शकणारे ऊर्जा साठवणूक उपकरण तयार करण्याचा निर्धार केला होता, असे या निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय विद्यार्थी ठरला प्रमुख युवा वैज्ञानिक
By admin | Published: October 23, 2014 4:46 AM