हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:35 AM2022-02-27T08:35:25+5:302022-02-27T08:36:18+5:30
हजारो विद्यार्थ्यांना संकटातही मायदेशी परतण्याची आस
नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर माेठे संकट आले आहे. नागरिकांची खाण्यापिण्याची वानवा झाली असून, पॅकबंद अन्नाच्या किमती २ ते ३ पटींनी वाढल्या आहेत. अनेकांना बिस्कीट, चिप्स आणि पाण्यावर गेले दाेन दिवस काढावे लागले आहेत, तर हंगेरीच्या सीमेवर पाेहाेचलेल्या विद्यार्थ्यांना अनेक तास ओलांडूनही सीमा पार करता आलेली नाही. उणे दोन अंश सेल्सिअस तापमानात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा धीर खचू लगाला आहे. मात्र, या परिस्थितीला धैर्याने ताेंड देत विद्यार्थी मायदेशी परतण्याची आस लावून बसले आहेत. इवानाे येथून १८ विद्यार्थी हंगेरीच्या सीमेवर भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता पाेहाेचले. सुमारे ७०० किलाेमीटरचा प्रवास त्यांनी जीव मुठीत घेऊन केला. मात्र, त्या ठिकाणी वाहनांची लांब रांग लागली आहे. रिझवान नावाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवर व्हिडिओ पाेस्ट करून व्यथा मांडली आहे. ताे म्हणाला, आमचे धैर्य खचू लागले आहे. सीमेवर एकही भारतीय अधिकारी नाही, काेणीही जबाबदारी घेत नाही.
एखाद्या क्षेपणास्त्राने आम्हाला उडविले असते तर बरे झाले असते, असे ताे उद्वेगाने बाेलला. दूतावासाने दिलेल्या चेक पाॅइंटवरील हेल्पलाईन क्रमांकावर काेणाशीही संपर्क हाेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
टर्नाेपील हे शहर रेड झाेनमध्ये आहे. रशियन विमाने या ठिकाणी बाॅम्ब हल्ले करीत आहे. शुभम नावाच्या विद्यार्थ्याने हा कटू अनुभव साेशल मीडियातून मांडला. त्याने सांगितले, की आम्हाला हाॅस्टेलच्या तळघरात ठेवले आहे. या ठिकाणी लाेक लपलेले आहेत, हे कळू नये म्हणून रात्री लाईट बंद करावी लागते. खाण्यापिण्याच्या वस्तू दोन-तीन पटींनी महाग झाल्या आहेत. आम्ही चिप्स, बिस्कीट आणि पाण्यावर दाेन दिवस काढले.