वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दोनशे वर्षांहून अधिकच्या इतिहासात तेथील सर्वोच्च न्यायालयावर एका मूळ भारतीय वंशाच्या न्यायाधीशाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मूळचे चंदीगडचे असलेले व सध्या अमेरिकेत संघीय जिल्हा न्यायालयावर असलेले ४९ वर्षांचे श्रीकांत (श्री) श्रीनिवासन यांना हा पहिला बहुमान मिळेल, असे न्यायिक व राजकीय वर्तुळात बऱ्यापैकी खात्रीने मानले जात आहे.श्रीनिवासन हे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या खास विश्वासातील आहेत व जिल्हा न्यायालयावर नियुक्ती केली तेव्हा ओबामा यांनी ‘श्रीं’च्या कायद्याच्या ज्ञानाची व हुशारीची जाहीरपणे तोंडभरून स्तुती केली होती.सर्वोच्च न्यायालयावरील एक विद्यमान न्यायाधीश अँतोनिन स्कालिया यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. या जागेवर ओबामा श्रीनिवासन यांची नियुक्ती करतील, असे निरीक्षकांना वाटते. याची दोन प्रमुख कारणे सांगितली जातात. एक म्हणजे, न्यायाधीशांच्या नेमणुकीस सिनेटकडून मंजुरी मिळावी लागते. ओबामा राष्ट्राध्यक्ष असले तरी त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षास सिनेटमध्ये बहुमत नाही. सध्याच्या पदावर श्रीनिवासन यांना जून २०१२ मध्ये नेमले गेले तेव्हा सिनेटच्या ९७ सदस्यांनी एकमताने ते मंजूर केले होते. त्यामुळे ज्यास सिनेटने आधीच पसंती दिली आहे, अशी व्यक्ती ओबामा नियुक्तीसाठी पसंत करतील, असे मानले जात आहे. दुसरे असे की, सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीश त्यांच्या विचारसरणीने उघडपणे ओळखले जातात. स्कालिया हे न्यायाधीशांपैकी आघाडीचे परंपरावादी होते व ते असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात परंपरावादी न्यायाधीश पाच विरुद्ध चार अशा बहुमतात होते. आता स्कालिया यांच्या निधनाने परंपरावादी व पुरोगामी न्यायाधीशांची संख्या प्रत्येकी चार अशी समसमान झाली आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांची नियुक्ती करून न्यायालयात पुरोगामी न्यायाधीशांचा वरचष्मा निर्माण करण्याची संधी ओबामा दवडणार नाहीत, असेही निरीक्षकांना वाटते.
अमेरिकी सर्वोच्च न्यायालयावर भारतीय वंशाचा न्यायाधीश?
By admin | Published: February 15, 2016 3:41 AM