सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या येथील एका उपनगरात भारतीय महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी वंशवादी विचारसरणीचे कोणतेही धागेदोरे सापडले नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करीत असलेल्या प्रभा अरुण कुमार (४१) यांची शनिवारी चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे रविवारी समोर आले होते. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही.न्यू साऊथ वेल्सच्या होमीसाईड स्क्वॅडचे कमांडर मायकल विलिंग यांनी सांगितले की, हा अचानक केलेला हल्ला असू शकतो का किंवा याला अन्य काही कंगोरे आहेत यादृष्टीने आम्ही तपास करीत आहोत. तपासासाठी हेरांचीही मदत घेतली जात आहे. प्रभा अरुण कुमार यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. वेस्टमीडमध्ये शनिवारी हल्ल्यावेळी प्रभा भारतामध्ये आपल्या पतीशी फोनवर बोलत होत्या. सिडनीतील भारताचे महावाणिज्यदूत संजय सुधीर म्हणाले, ‘मी खूप लोकांशी, अनेक यंत्रणांशी बातचीत केली आहे. यामध्ये वंशवादी विचारसरणीचा हात असेल यादृष्टीने मला कोणतीही बाब आढळली नाही. हत्येवेळी त्या आपल्या भारतातील पतीशी फोनवर बोलत होत्या.’ तत्पूर्वी, न्यू साऊथ वेल्स पोलिसांचे प्रमुख माईक बार्ड यांनी सुधार यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रभा यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. (वृत्तसंस्था)