Saudi Arabia Desert : सौदी अरेबियामध्ये एका भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सौदी अरेबियामध्ये टॉवर टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तेलंगणातील २७ तरुणाचा सहकाऱ्यासोबत मृत्यू झाला. पाण्याविना सौदी अरेबियाच्या वाळवंटात अडकल्याने दोघांचा मृत्यू ओढावला. वाळवंटात तांत्रिक बिघाडामुळे दोघांनाही शोधणं कठीण झालं होतं. भारतीय तरुणाच्या मृ्त्यूनंतर तेलंगणामध्ये त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
तेलंगणातील २७ वर्षीय शहजाद खान हा सौदीमध्ये टॉवर टेक्निशियन काम करत होता. टॉवरमधील बिघाड दूर करण्यासाठी तो सहकाऱ्यासह गाडीमधून गेला होता. शहजादला टॉवरच्या दुरुस्तीचे काम रुबा अल-खली वाळवंटात मिळाले होते. हे जगातील सर्वात धोकादायक वाळवंटांपैकी एक वाळवंट आहे. दोघेही कारमधून निघाल्यावर दोघांनीही जीपीएसद्वारे बिघाडाच्या ठिकाणी जाणे पसंत केले. मात्र वाटेतच जीपीएस बंद पडलं. त्यामुळे दोघेही रस्ता चुकले आणि रुबा अल-खली वाळवंटात अडकून पडले. त्यानंतर बराच वेळ मदत न मिळाल्याने शेवटी डिहायड्रेशनने त्यांचा मृत्यू झाला.
शहजाद रस्ता चुकल्याने बराच काळ धोकादायक वाळवंटात आणि वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये अडकले होते. त्यांना त्यांचे दुरुस्तीने ठिकाण कळू शकले नाही आणि परत जाण्याचा मार्गही त्यांना दिसत नव्हता. दोघेही वाळवंटात भटकत राहिले. त्यांच्याकडे इतरांशी संपर्क करण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यांच्या गाडीतील डिझेलही संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली. प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेमुळे दोघेही थकले आणि त्यांचा मृत्यू झाला.
शहजाद आणि त्याचा सहकारी पाच दिवसांपूर्वी कामावर आले होते. शहजाद खान हा तेलंगणातील करीम नगर जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या तीन वर्षांपासून सौदी अरेबियात काम करत होता. तो अल हासा भागातील एका टेलिकॉम कंपनीत टॉवर टेक्निशियन म्हणून काम करत होता. पाणी आणि अन्नाशिवाय वाळवंटाच्या तीव्र उष्णतेमध्ये, शहजाद आणि त्याच्या साथीदाला अडचणींचा सामना करावा लागला आणि शेवटी निर्जलीकरण आणि थकवा यामुळे त्यांचा जीव गेला. अनेक दिवस दोघेही सापडले नसताना कंपनीने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यानंतर सौदीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर त्यांचे मृतदेह वाळवंटात सापडले.