लंडन : इराकच्या नजफ प्रांतात अडकलेल्या भारतीयांचे पासपोर्ट परत करण्यास कंपन्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना मायदेशी परतता येत नसल्याचे ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने म्हटले आहे.
इराकमध्ये बंडखोर - सरकारी सुरक्षा दलातील संघर्ष तीव्र झाल्यामुळे आणि देशभरातील नागरिकांना बसत असलेली याची झळ पाहता अडकलेल्या भारतीय कामगारांसाठी धोका वाढला असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
हे सर्व भारतीय कामगार पायाभूत सुविधा प्रकल्प आणि बांधकाम कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाने यातील काही कामगारांशी संपर्क साधला होता. आपल्याला पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे या कामगारांनी सांगितले. एका कामगाराने दूरध्वनीवर सांगितले की, कंपन्यांनी आमचे पासपोर्ट ठेवून घेतले असून ते परत देण्यास नकार दिला आहे. लढाई सुरू झाल्याने आम्ही भयभीत असून कंपनीच्या आवारातच थांबत आहोत. पासपोर्टशिवाय आम्ही मायदेशी परतू शकत नसून दिवसागणिक आमची भीती वाढत चालली आहे. (वृत्तसंस्था)
आम्ही फक्त मायदेशी परतू इच्छितो, असेही हा कामगार म्हणाला. आम्ही आमचा मुद्दा बगदादमधील भारतीय दूतावासासमोर मांडला. त्यावर दूतावासाने पासपोर्टची माहिती एसएमएसद्वारे आम्हाला पाठविण्यास सांगितले आहे. कामगारांनी पासपोर्टचे विवरण 19 जूनलाच दूतावासाला पाठविले असून ते आता उत्तराची प्रतीक्षा करत आहेत. (वृत्तसंस्था)