पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतातील नागरिकांचे कौतुक केले आहे. भारतीय प्रतिभावान आणि प्रेरित करणारे असल्याचे सांगत येत्या काळात भारत अभूतपूर्व यश मिळवेल, असा विश्वास पुतीन यांनी व्यक्त केला. “भारताकडे भरपूर क्षमता आहे. विकासाच्या बाबतीत भारत उत्कृष्ट परिणाम साधेल यात शंका नाही,” असे शुक्रवारी रशियाच्या एकता दिनानिमित्त केलेल्या आपल्या संबोधनादरम्यान पुतीन म्हणाले. “भारत आपल्या विकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट परिणाम साध्य करेल, यात शंका नाही. सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येच्या देशात आता ती क्षमता आहे. भारतात खूप प्रतिभावान आणि प्रेरित करणारी लोक आहेत, आपण भारताकडे पाहू या,” असेही त्यांनी नमूद केले.
यादरम्यान पुतीन यांनी आफ्रिकेतील वसाहतवाद, भारताची क्षमता आणि रशियाची 'अद्वितीय सभ्यता आणि संस्कृती' याविषयी चर्चा केली. पुतीन यांनी भाषणादरम्यान सांगितले की, पाश्चात्य साम्राज्यांनी आफ्रिकेला लुटले आहे. बर्याच प्रमाणात, पूर्वीच्या वसाहतवादी शक्तींनी प्राप्त केलेली समृद्धी ही आफ्रिकेच्या लुटीवर आधारित आहे. हे सर्वांना माहीत आहे. होय, प्रत्यक्षात ते खरे आहे आणि युरोपमधील संशोधक ते लपवत नाहीत. “रशिया हा बहुराष्ट्रीय ओळख असलेला देश आहे. त्याला एक अद्वितीय सभ्यता आणि संस्कृती आहे. रशिया हा युरोपियन संस्कृतीचा भाग आहे. रशिया जगातील एक मोठी शक्ती म्हणून उदयास आलाय. ही खरोखर एक अद्वितीय सभ्यता आणि एक अद्वितीय संस्कृती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी मोदी आणि परराष्ट्र धोरणाचं कौतुक“भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि देशाच्या हितावर आधारित आहे. पंतप्रधान मोदी अशा नेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्यासाठी आपल्या देशाचे हित सर्वोपरि आहे. पंतप्रधान मोदींसारख्या नेत्यांसाठी राष्ट्रहिताच्या वर काहीही नाही. ब्रिटीश वसाहतवादापासून मुक्त राहून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाच्या जोरावर बरीच प्रगती केली आहे. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे रशिया आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच मजबूत आणि विश्वासार्ह राहिले आहेत. आता येणारी वेळ भारताची आहे,” असे पुतीन यापूर्वी म्हणाले होते.