वॉशिंग्टन : राज्य विधानसभांसह अमेरिकेत नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारली आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निकी हेले व कॅलिफोर्नियाच्या महाधिवक्ता कमला हॅरीस यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन या यादीत आघाडीचे स्थान पटकावले आहे. कोलारॅडोत रिपब्लिकनचे जनक जोशी हाउस १६ डिस्ट्रिक्ट येथून तर ओहिओत रिपब्लिकनचेच नीरज अंतानी हे स्टेट हाउस ४२ डिस्ट्रिक्ट येथून निवडून आले. सेवानिवृत्त डॉक्टर प्रसाद श्रीनिवासन कनेक्टिकट हाउस ३१ डिस्ट्रिक्ट येथून तर सॅमसिंग मिशिगन हाउस ६९ डिस्ट्रिक्ट येथून पुन्हा निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे मेरिलॅण्डमध्ये कुमार भावे आणि अरुणा मिलर यांनीही विजय मिळवला आहे. वॉशिंग्टन राज्यात डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमिला जयपाल निवडून गेल्या तर सतपाल संधू स्टेट हाउस ४२ डिस्ट्रिक्ट येथून पराभूत झाले आहेत. दरम्यान, अॅमी बेरा आणि रो खन्ना यांना कॅलिफोर्नियात काँग्रेसच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेतील एकमेव भारतीय अमेरिकी संसद सदस्य अॅमी बेरा हे रिपब्लिकन पार्टीचे त्यांचे प्रतिस्पर्धी डोग ओसे यांच्याहून ४०० मतांनी आघाडीवर आहेत. कॅलिफोर्निया गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार निल केशकरी अपेक्षेनुसार पराभुत झाले आहेत. कॅलिफोर्निया गव्हर्नरपदासाठी चौथ्यांदा रिंगणात उतरलेले डेमोक्रॅटिक उमेदवार व विद्यमान गव्हर्नर जेरी ब्राउन यांनी त्यांचा पराभव केला. कॅलिफोर्निया डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. याशिवाय मनन त्रिवेदी तिसऱ्यांदा अपयशी ठरले आहेत. ते पेन्सिलव्हेनियातील सहाव्या काँग्रेस डिस्ट्रिक्टसाठी निवडणूक रिंगणात होते. रिपब्लिकनचे उमेदवार रेयान कोस्टेलो यांनी त्यांचा पराभव केला. त्रिवेदी यापूर्वी २०१० व २०१२ मध्येही पराभूत झाले होते. लिबरटॅरियन पक्षाच्या तिकिटावर प्रतिनिधी सभेची निवडणूक लढवत असलेले अरुण व्होरा यांना मेरिलॅण्डच्या चौथ्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीयांनी मारली बाजी
By admin | Published: November 06, 2014 2:58 AM