दुबई: विक्रमी पावसाच्या धक्क्यातून अजूनही दुबई सावरलेली नाही. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु परिस्थिती अद्याप रुळावर न आल्याने लांब पल्ल्याची विमान वाहतूक करणाऱ्या एअर इंडिया, ‘अमिराती’ या कंपनीने शुक्रवारी आपली सेवा स्थगित करण्याची घोषणा केली. दुबईतील वाईट हवामानाच्या फटक्यातून विमानसेवा सुरळीत करण्याचा एका भाग म्हणून आम्ही शनिवारपर्यंत आमची सेवा स्थगित करत आहोत, असे ‘अमिराती’ने एक्सवर सांगितले.
फ्लायदुबई या विमान कंपनीच्या सेवेत देखील व्यत्यय आला. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जगातील सर्वात व्यग्र विमानतळ आहे. ते २४ तासांच्या आत सामान्य वेळापत्रकावर परत येण्याची आशा आहे, असे त्यांच्या सीईओंनी गुरुवारी रात्री उशिरा सांगितले. संयुक्त अरब अमिरातीसारख्या वाळवंटी प्रदेशात अत्यल्प पाऊस पडतो, परंतु हवामान तज्ज्ञ काही दिवसांपासून मोठ्या ढगफुटीचा इशारा देत होते. मंगळवारी १४२ मिलिमीटर (५.५९ इंच) पेक्षा जास्त पावसाने दुबईची तुंबई झाली. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नोंदीनुसार वर्षभरात सरासरी ९४.७ मिलीमीटर (३.७३ इंच) पाऊस पडतो.
भारत म्हणतो...संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) भारतीय दूतावासाने दुबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर कामकाज सामान्य होईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.दूतावासाने सांगितले की यूएईचे अधिकारी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत.