लॉस एन्जल्स : अमेरिकेत बेकायदा प्रवेश करून गेली २० वर्षे येथे राहणाऱ्या गुरुमुख सिंग या भारतीयास मायदेशी परत पाठविण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून स्थलांतर आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅलिफोर्नियात ताब्यातघेतले.गुरमुख सिंग यांचा अमेरिकेतील प्रवेश आणि वास्तव्य बेकायदा असल्याने त्यांना देशातून हाकलून देण्याचा प्रशासकीय आदेश याआधीच झाला होता. याविरुद्ध त्यांनी केलेले शेवटचे अपिलही ९व्या सर्किटच्या अपिली न्यायालयाने सोमवारी फेटाळल्यानंतर गुरमुख यांना स्थानबद्ध करण्यात आले. आता त्यांची सक्तीने भारतात परत पाठवणी अटळ आहे.नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा नियम कडक करून अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरुद्ध जोमाने कारवार्ई सुरु केली आहे. अशा हजारे बेकायदा निवासींना हुडकून त्यांना सक्तीने देशाबाहेर काढण्याचे आदेश झाले असून गुरमुख हे त्यांच्यापैकीच एक आहेत.मुळचे भारतातील पंजाबचे असलेले गुरमुख सिंग ४६ वर्षांचे असून ते अमेरिकेत टॅक्सी चालवतात. सन १९९८ मध्ये ते मेक्सिकोच्या सीमेवरून व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे अमेरिकेत आले. नंतर त्यांनी भारतात धार्मिक कारणावरून छेळ होत असल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेत राजाश्रय मिळण्यासाठी रीतसर अर्ज केला. पण तो फेटाळला गेला व त्यांना भारतात परत पाठवून देण्याचा आदेशही बऱ्याच वर्षांपूर्वी झाला. पण तरीही ते अमेरिकेतच राहात होते.सन २०१० मध्ये गुरमुख यांनी अमेरिकी नागरिक असलेल्या एका स्त्रिशी विवाह केला व तिच्यापासून त्यांना दोन मुलीही झाल्या. ही नवी कौटुंबिक स्थिती दाखवून त्यांनी सन २०१२ मध्ये स्थायी निवासी व्हिसासाठी अर्ज केला आणि त्यांच्या बेकयाद वास्तव्याचा व आधी झालेल्या हकालपट्टी आदेशाचा मुद्दा पुन्हा समोर आला. त्याही वेळा सुमारे पाच महिने कैद केले गेले होते व नंतर मानवी हक्क कार्यकर्ते जामीन राहिल्यावर त्यांची सुटका झाली होती. तेव्हापासून देशाबाहर पाठवून देण्याच्या मूळ आदेशाविरुद्धची त्यांची न्यायालयीन लढाई सुरु झाली व सोमवारी अपिली न्यायालयाच्या निकालाने ती संपली.अधिकाऱ्यांनी सोमवारी ताब्यात घेण्यापूर्वी सदगदित झालेले गुरमुख सिंग मुलीला म्हणाले, आता आपल्या कुटुंबाचे पुढे काय होणार हे मला माहित नाही. मला माफ करा आणि काळजी घ्या! (वृत्तसंस्था)देशाच्या कायदे व्यवस्थेनुसार गुरमुख यांचे येथील वास्तव्य बेकायदा असल्याचे ठामपणे सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली गेली आहे. ज्यांच्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते अशा बेकायदा वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना देशाबाहेर काढण्यास अमेरिकेतील नव्या प्रशासनाचे प्राधान्य असले तरी बेकायदा राहणाऱ्या इतरांविरुद्धही अशी कारवाई नक्कीच केली जाऊ शकते.-लोरी हेली, प्रवक्त्या, स्थलांतर आणि सीमाशुल्क विभागमाझ्या वडिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते नियमितपणे कर भरत असत व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चारचौघांसारखे सामान्य आयुष्य ते जगत होते. त्यांची अटक व भारतात केल्या जाणाऱ्या संभाव्य पाठवणीने आमचे कुटुंब भावनिक व ऐहिकदृष्ट्या पार कोलमडून गेले आहे.-मनप्रीत, गुरमुख सिंग यांची मुलगी
२० वर्षे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयाची होणार हकालपट्टी...
By admin | Published: May 10, 2017 1:17 AM