ऑनलाइन लोकमत -
न्यूयॉर्क, दि. 01 - सिरियामध्ये काही भारतीयांचं वास्तव्य असल्याची माहिती इसीसशी (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया) संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या फ्रेंच नागरिकाने दिली आहे. दहशतवादी संघटना इसीसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली रेदा हेम याला गेल्यावर्षी पॅरिसमधून अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असताना सिरियामध्ये जेव्हा मला एका खोलीत ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी तिथे माझी भेट काही भारतीय आणि रशियन नागरिकांशी झाल्याचं सांगितलं आहे.
सिरियामधून परतल्यानंतर लगेचच ऑगस्टमध्ये रेदा हेमला अटक करण्यात आली होती. 'फ्रान्समध्ये रॉक कॉन्सर्टदरम्यान हिंसाचार घडवण्याची कामगिरी इसीसने माझ्यावर सोपवली होती, त्यासाठीच माझी नेमणूक करण्यात आली होती', अशी माहिती रेदा हेमने चौकशीदरम्यान दिली आहे. सिरियामध्ये रशियन बोलणा-या हल्लेखोरांची संख्या जास्त असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या एका लेखात म्हटलं आहे.
रेदा हेम इसीसमध्ये भर्ती होण्यासाठी सिरियामध्ये गेला असता सुरुवातील त्याला एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आलं होतं. त्या खोलीत त्याच्यासोबत हजारो लोक होते. ज्यामध्ये रशियन, चीनी, अमेरिकी आणि भारतीय नागरिकांचा समावेश होता. 2014 पासून इसीस पश्चिम देशांवर हल्ल्याचा प्रयत्न करत आहे. अबू मुहम्मद अल-अदनानीच्या नेतृत्वाखाली या हल्ल्यांचा कट रचला जात आहे.