महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची महती महाराष्ट्रा सीमारेषा ओलांडून थेट लंडनला पोहोचली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, उद्योगधंद्यांच्या सर्वांगिण हितकारक योजनांसमवेत महाराष्ट्रातील सर्वच स्तरातील नागरीकांसाठी गेली 5 वर्षे कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारचा गौरव करण्यासाठी लंडन येथे महाराष्ट्र ओवरसीज फ्रेंडस ऑफ भारतीय जनता पार्टी (युके) यांनी शनिवारी एक मेळावा आयोजित केला होता.साता-समुद्रापार वसलेले अनिवासी भारतीय, आपल्या देशाविषयी बाळगून असलेल्या आत्मियतेचे जणू हे एक प्रतिकच होते.
मातृभूमीपासून अनेक कोस दूर असूनही भारतीयांच्या मनात असलेला भाव व्यक्त करण्यासाठी व परस्पर संबंध दृढ करण्यासाठी, OFBJP ही संस्था जगभर कार्यरत आहे. सदर संस्था आपल्या अनेकविध कार्यक्रमांद्वारे भारत सरकारच्या विकसनशीलतेच्या आलेखाचा परदेशांमध्ये प्रसार करीत असते. Maharashtra OFBJP UK हा, महाराष्ट्राला केंद्रस्थानी मानून कार्यरत झालेला OFBJP UK चा एक विभाग आहे.
गेली 5 वर्षे अंमलात आणल्या गेलेल्या विविध जनहितकारक योजनांचा आढावा सदर मेळाव्यामध्ये घेण्यात आला. ‘जलयुक्त शिवार’ सारख्या क्रांतिकारी योजनेमुळे शेती-वाडी, खेडो-पाडी उपलब्ध करून दिलेला पाणीपुरवठा, औद्योगिक क्षेत्रामधील गुंतवणुकीत अनेक पटींनी झालेली वाढ, ‘घर माझ हक्काच’ द्वारे लहान-मोठ्या शहरांत सुरू असलेले आवास-निवास प्रकल्प, ह्याविषयी विविध अंगी चर्चाही करण्यात आली. 2025 सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महापद्म ($1 Trillion) पर्यंत पोचवण्याच्या सरकारच्या महत्वाकांक्षी उद्दीष्टांचे स्वागत करण्यात आले.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ह्या मेळाव्याला शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या लोकाभिमुख, पारदर्शी कारभाराविषयी संतोष व्यक्त करण्यात आला. तसेच, आगामी 5 वर्षांसाठीचा कार्यकाल यशस्वी करण्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.देशाची अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था, देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था, तसेच परदेश नीती यामध्ये होत असलेली उत्तरोत्तर प्रगती, ज्यामुळे भविष्यातील जागतिक घडामोडीत अग्रेसर होण्याच्या दिशेकडे जोमाने सुरू असलेल्या दमदार वाटचालीमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्प राज्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी कार्य करून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, ह्या हेतूने MAHA OFBJP UK ने संघटीत होऊन काम करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला.
‘पुन: देवो’ ह्या घोषणेने प्रेरीत होऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युकेमधील महाराष्ट्रीय नागरीकांनी एक आराखडा तयार केला. महाराष्ट्राची प्रगतीशील वाटचाल व सरकारची कार्यप्रणाली केंद्रबिंदू मानून त्यादृष्टीने काम करण्यासाठी जबाबदारी सुनिश्चित करण्यात आली. त्यामध्ये, संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले महाराष्ट्र सरकारच्या समाधानी कार्यकाल व अपेक्षांसंबंधीचे विचार चित्रित करण्यात आले असून ते महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. विविध मतदारांशी दूरध्वनीद्वारे लंडन येथून संपर्क साधण्याचे नक्की करण्यात आले. उपस्थितांची सहा विभागात विभागणी करून एक चर्चा सत्र घेण्यात आले व त्यांचे विचार तुषार जोगे ह्यांनी मांडले.याप्रसंगी, OFBJP UK चे माजी अध्यक्ष डॉ आंबेकर यांनी OFBJP UK ची स्थापना व त्याची पार्श्वभूमी सांगितली. तरूण नेते सुशील रापटवार यांनी Maharashtra OFBJP UK च्या पुढील वाटचालीची रूपरेखा सांगितली. शार्दूल कुळकर्णी यांनी दृक-श्राव्य पद्धतीने अर्थपूर्ण आकडेवारी सादर केली. तर विलास काळकर ह्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनिल नेने ह्यांनी सूत्रसंचालन केलेल्या ह्या कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस यांनी खास पाठविलेला संदेश दाखवण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ‘गोंधळ‘ व लावणीचे सादरीकरण करण्यात आले. OFBJP UK अध्यक्ष कुलदीप शेखावत, सह-कार्यवाह सुरेश मंगळगिरी, कोषाध्यक्ष शशीभाई पटेल यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते