नवी दिल्ली: भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांकडून स्विस बँकांमध्ये जमा करण्यात येणाऱ्या पैशात घट झाली आहे. 2018 मध्ये भारतीयांनी स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या रकमेत 6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. स्विस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम सध्या 95.5 कोटी स्विस फ्रँक (6,757 कोटी रुपये) इतकी आहे. स्विस नॅशनल बँकेनं (एसएनबी) ही आकडेवारी जाहीर केली. भारतीयांसोबतच जगभरातील अनेक देशांमधील नागरिकांकडून स्विस बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेत घट झाली आहे. जगभरातून स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचं एकूण मूल्य 1.40 लाख कोटी स्विस फ्रँक (99 लाख कोटी रुपये) इतकं आहे. झ्युरिचमध्ये असलेल्या स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकिंग प्राधिकरणाकडून दरवर्षी याबद्दलची आकडेवारी जाहीर करण्यात येते. भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी जमा केलेली रक्कम विचारात घेऊन आकडेवारी सादर करण्यात आल्याची माहिती एसएनबीनं दिली. स्वित्झर्लंडमधील बँकांच्या अहवालातील अधिकृत माहितीच्या आधारे ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. स्विस बँकांमध्ये जमा असणाऱ्या भारतीयांच्या काळ्या पैशाचा मुद्दा कायम चर्चेत असतो. मात्र स्विस नॅशनल बँकेनं दिलेल्या माहितीवरुन नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही. भारतीयांनी आणि अनिवासी भारतीयांनी इतर देशांच्या चलनांच्या स्वरुपात जमा केलेल्या पैशाचा समावेश स्विस नॅशनल बँकेनं दिलेल्या आकडेवारीत नाही. भारतीय नागरिकांनी स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशात 2017 मध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर यामध्ये घट झाली.
स्विस बँकांकडे भारतीयांची पाठ? बँकांमधील भारतीयांची 'माया' आटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 8:12 AM