ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 29 - भारतीय पासपोर्ट धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेचा व्हिजा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश करता येणार आहे. यूएईत प्रवेश केल्यावर त्यांना व्हिजा मिळणार आहे. यूएईच्या कॅबिनेटनं या विधेयकाला मंजुरी दिली असून, आज त्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा व्हिजा फक्त 14 दिवसांपुरता मर्यादित असेल. तसेच अतिरिक्त शुल्क देऊन तुम्हाला हा व्हिजा आणखी वाढवता येणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं यूएईनं हे पाऊल उचललं आहे. त्याप्रमाणेच जागतिक पर्यटनालाही चालना देण्याचा यूएईचा उद्देश आहे. ज्या भारतीय नागरिकांकडे साधा पासपोर्ट किंवा ग्रीन कार्ड आहे, अशा नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिजा मिळणार आहे. मात्र हा व्हिजा 14 दिवसांपुरताच मर्यादित राहणार आहे. मात्र या व्हिजाचं नूतनीकरण करायचे असल्यास तुम्हाला अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती यूएईनं दिली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 6 हजार कोटी डॉलरची उलाढाल होते. मेकिंग इंडियासाठी भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा यूएई आहे. यूएई भारतात 2700 कोटी डॉलरचा माल निर्यात करतो, तर भारत 45,000 कंपन्यांच्या माध्यमातून 3300 कोटी डॉलरचा माल यूएईमध्ये निर्यात करतो. त्याचप्रमाणे यूएई भारतात ऊर्जा, धातू उद्योग, सेवा, तंत्रज्ञान आणि बांधकाम आदी क्षेत्रात एक हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करत आहे.