ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 4 - मोदी यांच्या अमेरिका भेटीत एच १बी व्हिसावर काही तरी तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र या भेटीतून भारतीयांच्या हाती म्हणावं तितकं काही लागलं नाही. तरीही भारतीयांचा अमेरिकेतील प्रवेश आधीच्या तुलनेत सोपा होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेत भारतीय लोकांना जागतिक प्रवेश कार्यक्रमांतर्गत प्रवेश दिला जाणार असून, अमेरिकेत कमी धोकादायक प्रवाशांच्या यादीत त्यांना स्थान मिळणार आहे. अमेरिकेतल्या 53 विमानतळांवर भारतीयांना प्रवेश मिळणार आहे. या 53 विमानतळांवर भारतीयांची कस्टमच्या चौकशीतून सुटका होणार आहे. मात्र भारतीय प्रवाशांना हातांचे ठसे, पासपोर्ट आणि अन्य काही कागदपत्रं द्यावी लागणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमेरिकेनं भारतीय प्रवाशांचा विश्वासू प्रवाशांमध्ये समावेश केला आहे. भारतीय नागरिक आता आमचे विश्वासार्ह प्रवासी झालेत. त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांना कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागणार नसल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. भारतासह अर्जेंटिना, कोलंबिया, जर्मनी, मॅक्सिको, नेदरलँड, पनामा, सिंगापूर, स्वित्झर्लंड अशा देशांचा अमेरिकेने जागतिक प्रवेश कार्यक्रमात समावेश केलाय.
दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी ट्रम्प व मोदी यांच्यात दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत एकमत झाल्याचे नमूद केले. पाकिस्तानविषयी विचारता ते म्हणाले की, सीमेपलिकडून काही दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या कारवायांबाबत या निवेदनात पुरेसे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानविषयी आणि त्याने निर्माण केलेल्या समस्यांविषयी तसेच त्या सोडविण्याबाबत दोघा नेत्यांत सविस्तर चर्चा झाली आहे. दहशतवादाचे केंद्र कुठे आहे, याबाबत दोघांमध्ये एकमत झाले, असे सांगून जयशंकर म्हणाले की केवळ भारतालाच नव्हे, तर अफगाणिस्तानलाही हाच दहशतवाद छळत आहे. दोन देशांतील चर्चेत प्रथमच पाकिस्तानचा इतका स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
अल कायदा, इसिस, जैश-ए-मोहमद, लष्कर-ए-तोयबा आणि डी (दाऊद) कंपनी तसेच त्यांच्याशी संबंधित अन्य संघटना यांचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी एकत्र येण्याचे भारत व अमेरिकेने ठरविले आहे. जगाला असलेला दहशतवादाचा धोका लक्षात घेऊ न, तो संपवण्यासाठी एकत्र यायला हवे, याची चर्चा मोदी व ट्रम्प यांच्यात झाली, असे सांगून परराष्ट्र सचिव म्हणाले की, दोघांच्या भेटीआधीच सय्यद सलाऊद्दिन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून अमेरिकी प्रशासनाने आपण दहशतवादाच्या मुद्द्यावर किती कठोर आहोत, हे दाखवून दिले आहे.
मोदी महान पंतप्रधान
मोदी महान पंतप्रधान आहेत. माझे त्यांच्यासोबत बोलणे होत असते. मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगले काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे, त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही अमेरिकेत येणे ही सन्मानाची बाब आहे.- डोनाल्ड ट्रम्प
रणनीतीबाबत चर्चा
मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवाद, संघटना, त्यांच्या कारवाया याविषयीची माहिती एकमेकांना दिली आणि त्याविरुद्ध लढण्यासाठीची रणनीती तयार करण्याच्या दृष्टीने चर्चाही केली.
त्यासाठी गुप्तचरांकडून मिळालेली माहिती, दहशतवाद्यांचे सोशल मीडियावरील नेटवर्क आणि त्यांचा तपास यासाठी एकमेकांना मदत करण्याचे भारत व अमेरिका यांच्यात ठरले आहे, असे व्हाइट हाउसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
भारत सच्चा मित्र !
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूवी मी भारत अमेरिकेचा सच्चा मित्र आहे, असे म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरही मी ते पुन्हा एकदा अधोरेखीत करू इच्छितो.