रियाध : सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत. सौदी सरकारने नव्या बदलांद्वारे स्थानिकांना नोक-यांमध्ये प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.सौदीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत लाखो भारतीय नोकरी करत आहेत. तिथे २०१६ साली नोकºया करणाºया भारतीयांची संख्या २५ लाख होती. मात्र मागील काही महिन्यांत त्यात विविध कारणांमुळे घट झाली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण नोकरीसाठी सौदीला जात असतात. त्यातच सौदी अरेबियात १ जुलैपासून परदेशी व्यक्तीला दरमहा १०० रियाल म्हणजे सुमारे १७०० रुपये इतका कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवू लागले आहेत. दरम्यान, या करामुळे सौदीत राहण्याचा खर्च परवडणे अशक्य झाल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मोहम्मद ताहिरने दिली. ताहिर पेशाने संगणक तज्ज्ञ आहे. मागील चार महिन्यांत अनेकांनी आपली कुटुंबे भारतात पाठवल्याची माहिती स्थलांतरितांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली. (वृत्तसंस्था)
सौदी अरेबियामध्ये भारतीयांच्या नोक-यांवर गदा? कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:17 AM