लंडन : जागतिक उच्चशिक्षण संस्थांच्या यादीत भारताच्या ३१ संस्थांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. अर्थात, यात आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी पहिल्या स्थानावर आहे. ‘टाइम्स हाईयर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंंग २०१६-१७’तून ही माहिती समोर आली आहे. बंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स ही भारतील सर्वात अव्वल शिक्षण संस्था असल्याचे यात म्हटले आहे. ४०० विद्यापीठांच्या या यादीत भारतातील केवळ दोन विद्यापीठांचा यात समावेश करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स २०१-२५०च्या गटात आहे. गतवर्षी ही संस्था २५१-३०० च्या गटात होती. मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी ही संस्था ३५१-४०० च्या गटात आहे. पहिल्या २००च्या गटात भारताच्या एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. पाच वेळा अव्वल असलेली कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी ही दुसऱ्या स्थानावर आहे, तर स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय तिसऱ्या स्थानावर आहे. जगातील अव्वल ९८० संस्थांत दक्षिण आशियाच्या देशांनीही स्थान मिळविले आहे. यात श्रीलंकेच्या युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबोचा समावेश आहे, तर पाकिस्तानच्या सात संस्थांचा यात समावेश आहे. दी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगचे संपादक फिल बेटी म्हणाले की, ‘भारताच्या चार शिक्षण संस्थांचा यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. देशातील शिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या करण्यासाठी भारताने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे,’ असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
भारताच्या ३१ शिक्षण संस्था जगात टॉपवर
By admin | Published: September 23, 2016 1:25 AM