संयुक्त राष्टे - काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तान आणि चीन हे संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत तोंडावर आपटले आहेत. उलट या बैठकीत काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याबाबत भारताचं कौतुक करण्यात आलं. या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली नाही. मात्र बंद दरवाज्यामागे झालेल्या या बैठकीत भारताची कुटनीती समोर आली. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांच्या हजरजबाबी, तथ्य आणि कुटनीतीच्या उत्तरांनी पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद केली.
काश्मीर प्रश्नावरील चर्चेनंतर सय्यद अकबरुद्दीन यांची पत्रकार परिषद सुरु होती. ज्यात पाकिस्तानचे काही पत्रकारदेखील उपस्थित होते. पाकचे पत्रकार अकबरुद्दीन यांना काश्मीर आणि मानवाधिकार यावरुन प्रश्न विचारण्यात सुरुवात केली. पाकच्या पत्रकारांनी कलम 370 हटविण्यावरुन सय्यद अकबरुद्दीन यांना घेरण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. कलम 370 मधील सर्वाधिक तरतूदी हटविण्याचा निर्णय भारत सरकारचा आहे आणि भारताचा अंतर्गत मामला आहे असं अचूक उत्तर पत्रकारांना दिलं.
सय्यद अकबरुद्दीन यांनी सर्वात आधी पाकिस्ताच्या 3 पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. त्यावेळी अकबरुद्दीन यांचा आत्मविश्वास आणि कुटनीती उपस्थितांना दिसली. तुमच्या मनात कोणतीही शंका नको यासाठी मी पहिल्यांदा 3 पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतो असं सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले.
ज्यावेळी पाकिस्तानच्या शेवटच्या पत्रकाराने सय्यद अकबरुद्दीन यांना सवाल केला की, नवी दिल्ली इस्लामाबादमधून कधी वार्तांकन करणार? त्यावर अकबरुद्दीन पोडियमधून पुढे येत आत्मविश्वासाने त्याला बोलले. चला मला याची सुरुवात सर्वांत आधी तुमच्यापासून सुरु करुद्या. मला हात मिळवू द्या. त्यांनी पाकिस्तानच्या तिन्ही पत्रकारांशी हात मिळविले त्यावेळी उपस्थित इतर पत्रकारांना हसू आवरले नाही. त्यानंतर पोडियमवर जाऊन त्यांनी सांगितले आम्ही मैत्रीचा हात पुढे केला आहे. भारत शिमला समझोत्यासाठी कटिबद्ध आहे. फक्त पाकिस्तानकडून उत्तराची अपेक्षा आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर भारताची बाजू चोखपणे मांडली.''काश्मीर प्रश्नी भारताकडून सर्व आंतरराष्ट्रीय करारांचे योग्य प्रमाणे पालन करण्यात आले आहे. मात्र काही लोक आपल्या विचारसरणीच्या प्रचारासाठी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असल्याचा दावा करण्यात येत आहे,'' असे अकबरुद्दीन यांनी सांगितले.