संयुक्त राष्ट्र - भारताचा संयुक्त राष्ट्रात आज मोठा विजय झाला असून दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश म्हणून निवडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या शेवटच्या जागेसाठी दलवीर भंडारी आणि ब्रिटनच्या उमेदवारात लढत होणार होती. मात्र अखेरच्या क्षणी ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतल्याने दलवीर भंडारींचा विजय झाला. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाल 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते.
न्यू यॉर्कमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली. दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मतं मिळाली, तर सुरक्षा परिषदेच्या सर्वच्या सर्व 15 सदस्यांनीही त्यांनाच मत दिलं. याआधी नाट्यक्रम घडामोडी घडल्या आणि ब्रिटनने निवडणूक पार पडण्याच्या काही क्षण आधीच आपली उमेदवारी मागे घेतली, ज्यामुळे दलवीर भंडारी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
निवडणुकीआधी मानलं जात होतं की, सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असणारे देश अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन ब्रिटनचे उमेदवार ख्रिस्टोफर ग्रीनवूड यांना पाठिंबा देतील. ब्रिटन सुरक्षा परिषदेचा पाचवा स्थायी सदस्य आहे. पणा 12 व्या आणि अखेरच्या राऊंड पार पडण्याच्या काहीवेळ आधीच संयुक्त राष्ट्रात ब्रिटनचे प्रतिनिधी मॅथ्यू राइक्रॉप्ट यांनी पत्र लिहून ग्रीनवूड यांना निवडणुकीतून मागे घेत असल्याची माहिती दिली. ख्रिस्टोफर ग्रीनवूडदेखील दलवीर भंडारी यांच्यासोबत नऊ वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडले जाण्याची आशा व्यक्त करत होते.
दलवीर भंडारी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानव्यशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली. 1968 ते 1970 या काळात त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. शिकागो येथे काही काळ वकिलीही केली.
अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी 1973 ते 1976 या काळात राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. 1977 साली ते दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी गेले. या क्षेत्रातील 23 वर्षांच्या अनुभवानंतर 1991 साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर 2005 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची 19 जून 2012 रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली. इंटरनॅशनल लॉ असोसिएशनच्या भारतीय शाखेचे कार्यकारी सदस्य म्हणून भंडारी यांची 1994 सालापासून निवड झाली. 2007 साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.