इस्लामाबाद - अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली आहे. ''भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत,'' असे इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करताना सांगितले.
बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली असून, त्यासंदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता.
आज पाकिस्तानी संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित कराताना इम्रान खान म्हणाले की, ''भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत, मात्र पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे मूळ हे काश्मीर आहे,'' असा दावाही इम्रान खान यांनी केला. आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला होता. अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयामधील सुत्रांनी दिली होती. तसेच अभिनंदन यांना काही झाल्याच भारत कठोर पावले उचलेल असा इशाराही देण्यात आला होता.