न्यूयॉर्क : देशाचा कथित अपमान करणारा माहितीपट असल्याच्या चर्चेनंतर ‘इंडिया डॉटर’वरील बंदी दीर्घकाळ टिकणारी नसल्याचा दावा ब्रिटिश दिग्दर्शक लेस्ली उडविन यांनी केला आहे. लवकरच जनतेच्या मूल्यांना महत्त्व येईल. कारण देशातील न्यायालये ही सरकारच्या हातची ‘बाहुली’ नाहीत, असे त्या म्हणाल्या.‘इंडियाज डॉटर’च्या दिग्दर्शक लेस्ली उडविन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ही बंदी अधिक काळ टिकणार नाही. कारण भारतीय न्यायालये सरकारच्या हातची ‘बाहुली’ नाहीत. भारतात लोकशाही असून तो एक सभ्य देश आहे. तथापि, अलीकडे लागू करण्यात आलेली बंदी ही याविरोधी चित्र निर्माण करते. हे लोकशाहीत एक स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील धब्ब्याप्रमाणे आहे. ही बंदी अस्थायी स्वरूपाची आहे. तिचा दीर्घकाळ निभाव लागणार नाही. नागरी मूल्ये लवकरच परततील आणि बंदी हटविली जाईल. अशा प्रकारची मानसिकता संपेल तेव्हा आपली लाज झाकण्याऐवजी लोक महिलांच्या सुरक्षिततेवर आपले लक्ष्य केंद्रित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
‘इंडियाज डॉटर’ भारतात प्रसारित होणारच -लेस्ली
By admin | Published: March 10, 2015 11:30 PM