नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाकर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक व्यवहारात आयात वस्तूंमध्ये घट झाली होती. पाकिस्तानचा खूप कमी माल भारतात येऊ लागला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत सीमा कर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला होता.
पाकिस्तानकडून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलिअम उत्पादन आणि खनिजांचा समावेश होता. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी मार्च 2018 मध्ये पाकिस्तानकडून 3.48 कोटी डॉलरची देवाणघेवाण झाली होती. यंदा या व्यवहारामध्ये घट झाली आहे. पाकिस्तानकडून होणारी आयात यंदा मार्च महिन्यात 2.84 कोटी डॉलर होती.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महागाईची झळ सोसत असलेल्या पाकिस्तानात इमरान सरकार अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. पहिल्यांदाच 190 रुपये लिटर दूध विकलं जात आहे. आता सफरचंद 400 रुपये किलो, तर संत्रे 360 रुपये किलोनं विकले जात आहे. तर केळे 150 रुपये डझनानं विकली जात आहेत. मटणाची किंमत पाकिस्तानात 1100 रुपये किलो आहे. मार्चच्या तुलनेत मेमध्ये कांदा 40 टक्के, टोमॅटो 19 टक्के आमि मुगाची डाळ 13 टक्क्यांहून जास्त किमतीनं विकली जात आहे. साखर, मासे, मसाले, तूप, तांदूळ, पीठ, तेल, चहा, गहू यांच्या किमतीही 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बाजाराचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनुसार ऑटो, सिमेंट आणि फार्मास्युटिकल्स सारख्या उद्योगांना लागणाऱ्या कच्चा मालावरच्या आयातीची किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा भार पडणार आहे. व्यापाऱ्यांचा बाजारावरचा विश्वास उडाला आहे.
भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो. कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागले त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडला आहे.