वॉशिंग्टन : परदेशात रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांनी २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक मनीआॅर्डर पाठविल्या. विदेशातून ७२ अब्ज डॉलर रक्कम मनीआॅर्डरद्वारे मिळविण्यासोबत भारत याबाबतीत प्रथम क्रमांकावर आला आहे.भारतानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये परदेशातून मनीआॅर्डरद्वारे ६४ अब्ज डॉलर आले. जागतिक बँकेच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.२०१५ मध्ये परदेशातून मनीआॅर्डरद्वारे पाठविण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारत सर्वात मोठा देश ठरला आहे. भारत आणि चीननंतर फिलिपाईन्सचा क्रमांक लागतो. फिलिपाईन्समध्ये ३० अब्ज डॉलर मनीआॅर्डरद्वारे आल्याचे हा अहवाल म्हणतो.ज्या देशातून हे पैसे धाडण्यात आले, त्यात अमेरिका प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर सौदी अरेबिया आणि रशिया यांचा क्रमांक लागतो. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिवासी नागरिकांची संख्या वाढून २५ कोटींपेक्षा जास्त होणार आहे. कारण आर्थिक संधी शोधण्यासाठी नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात जात आहेत. वेगाने आर्थिक विकास करणारे विकसनशील देश आता दुसऱ्या विकसनशील देशांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. अनिवासी नागरिक यंदा आपल्या कुटुंबियांसाठी परदेशातून ६०१ अब्ज डॉलर इतकी रक्कम धाडतील.
मनीआॅर्डरद्वारे पैसे येणाऱ्या देशांत भारत प्रथम स्थानी
By admin | Published: December 20, 2015 10:32 PM