इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका, असे आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. हार्ट आॅफ एशिया संमेलनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अतिरेकी कारवाया करणाऱ्या शक्तींना कुठल्याही नावाने, कुठल्याही स्वरूपात आश्रय देण्यात येऊ नये. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष द्यावे. जग बदलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी भारताने पाकिस्तानला विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला. सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत एका अशा अफगाणिस्तानची कल्पना करतो जो की, व्यापार, परिवहन, ऊर्जा आणि संचार यांनी परिपूर्ण केंद्र असेल. पाकिस्तानसोबत विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी किंबहुना त्यांना सहकार्य करण्यासाठी आमची तयारी तर आहेच; पण तूर्तास अफगाणिस्तानच्या मदतीचा संकल्प तर करू या. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्यावर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, त्या देशात अतिरेकी कारवायांचे क्षेत्र आणि तीव्रता यात मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तान सरकारसोबत काम करण्यास, त्यांची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. (वृत्तसंस्था)भारत आणि पाकिस्तान परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली. यावेळी भारताचे परराष्ट्रसचिव एस. जयशंकर व शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांची उपस्थिती होती.सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानसोबतही आम्ही मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार आहोत. ती वेळ आता आली आहे की, आम्ही एकत्र काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि समजूतदारपणा दाखविण्याची गरज आहे. व्यापार व सहकार्य मजबूूत करायला हवे. कारण, संपूर्ण जग त्या क्षणाची वाट पाहत आहे. आम्ही त्यांना निराश करायला नको.सार्क परिषद सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानात होणार आहे. यापूर्वी जानेवारी २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. वाजपेयींनंतर पंतप्रधान बनलेले मनमोहनसिंगही पाकिस्तानचा दौरा करू इच्छित होते. मात्र त्यांना शक्य झाले नाही.सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, असे स्वराज यांनी सांगितले.
भारताचा पाकपुढे मैत्रीचा हात
By admin | Published: December 09, 2015 11:29 PM