वॉशिंग्टन : नोटाबंदीचा परिणाम ओसरत आला आहे. त्यामुळे यंदा भारताचा वृद्धिदर ७.२ टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. २0१६ मध्ये भारताचा वृद्धिदर ६.८ टक्के होता. जागतिक बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जागतिक बँकेने जानेवारीच्या अंदाजाच्या तुलनेत भारताचा वृद्धिदर अंदाज ४.0 टक्क्यांनी सुधारून घेतला आहे. भारत जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा देश म्हणून आपले स्थान पुन्हा पटकावणार आहे. जागतिक बँकेने वृद्धिदराचा अंदाज चीनसाठी ६.५ टक्के ठेवला आहे. २0१८ आणि २0१९ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.३ टक्के राहील, असेही बँकेने म्हटले आहे. बँकेने ताज्या अहवालात म्हटले की, भारताचा २0१८ मधील वृद्धिदर ७.५ टक्के, तर २0१९ मधील वृद्धिदर ७.७ टक्के राहील. जानेवारी २0१७ मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत ताजा अंदाज अनुक्रमे 0.३ टक्के आणि 0.१ टक्के कमी आहे. खासगी गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे गती घेऊ शकलेली नाही, त्यामुळे अंदाजात थोडी घसरण करण्यात आल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, २0१६ मध्ये चांगला मान्सून आणि कृषी, तसेच ग्रामीण भागातील वाढती मागणी, यामुळे भारताची आर्थिक आघाडी चांगली राहिली. याशिवाय पायाभूत क्षेत्रावरील वाढलेला खर्च, सरकारची मागणी याचाही चांगला परिणाम झाला. नोटांबदीचा निर्णय लागू केल्यामुळे अर्थव्यवस्थेला जोराचा धक्का बसला. (वृत्तसंस्था)
यंदा भारताचा वृद्धिदर ७.२ टक्के राहणार
By admin | Published: June 06, 2017 4:34 AM