गेल्या वर्ष दीड वर्षापासून भारताच्या मोस्ट वाँटेड यादीमध्ये असलेल्या अनेक पाकिस्तानीदहशतवाद्यांच्यापाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या झाल्याच्या घटना घडल्या होत्या. एका पाठोपाठ होत असलेल्या या हत्यांमुळे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडालेली आहे. पाकिस्तानने या हत्यांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असलेल्या RAWचा हात असल्याचा दावा केला जात आहे. याच आरोपांवरून द गार्जियन या ब्रिटिश वृत्तपत्राने एक सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. आता या आरोपांवर अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानने टार्गेट किलिंगवरून भारतावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, आम्ही या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांमधून येत असलेल्या वृत्तांचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणी आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. मात्र तणाव वाढवण्यापेक्षा या विषयी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, असं आवाहन आम्ही दोन्ही पक्षांना करतो, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सियालकोटमध्ये शहिद लतिफ आणि रावलकोटमद्ये मोहम्मद रियाज यांच्या हत्या भारतीय एजंट्स योगेश कुमार आणि अशोक कुमार आनंद यांनी केल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. पाकिस्तानमधील सियालकोट येथे मौलाना मसूद अझहरचा निटवर्तीय आणि पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला दहशतवादी शहिद लतिफ याची ११ ऑक्टोबर २०२३ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
या टार्गेट किलिंगनंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मोरक्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून, अनेक कुख्यात दहशतवादी हे भूमिगत झाले आहेत. अनेक मोस्ट वाँटेंड दहशतवाद्यांना आयएसआयने सुरक्षा पुरवली आहे. तर काहींनी हत्यारबंद खासगी सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. तसेच पाकिस्तानमधील मोठ्या शहरांमध्ये उघडपणे सभा घेणारे दहशतवादीही आता अशा सभा घेणं टाळत आहेत.