काठमांडू : नेपाळमध्ये महाप्रलयकारी भूकंप आल्यानंतर सर्वात आधी नेपाळमध्ये पथके दाखल झाली, ती एनडीआरएफ अर्थात नॅशनल डिझास्टर रिपॉन्स फोर्सची. ‘एनडीआरएफ’ने मदत आणि बचावकार्यात मोठी आघाडी घेतली. ढिगाऱ्यांखाली अडकलेले मृतदेह काढण्यात त्यांनी मोलाचे काम केले. एनडीआरएफ पाठोपाठ नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले. नेपाळमध्ये भारतीयांचे होणारे कौतुक चीनसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. नेपाळमध्ये भारताचा वाढत असलेला प्रभाव, नेपाळी जनतेमधून भारतीयांना मिळत असलेली आपुलकी चीनची अस्वस्थता वाढवणारी आहे. नेपाळमध्ये पाय पसरण्यासाठी चीन गेल्या २५-३० वर्षांपासून प्रयत्नशील आहे. नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर माओवाद्यांचा प्रभावही कमीकमी होत आहे. सध्या नेपाळमध्ये माओवाद्यांचा प्रभाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात भारतात उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले. नेपाळच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळशी सलोख्याचे संबंध राखण्याकडे कटाक्ष ठेवला. संरक्षणाच्या दृष्टिनेही नेपाळची भूमी भारतासाठी संवेदनशील आहे. त्यामुळे भारताने मोठ्या भावाची भूमिका बजावत नेपाळसाठी मदतीचा हात दिला असला तरीदेखील त्याला अनेक पदर आहेत. मानवतेचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच, पण भारतासाठी संरक्षणासह अन्य बाबी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे एक हजार स्वयंसेवक सध्या नेपाळमध्ये मदतकार्यात सहभागी झालेले आहेत. संघाचे सहसरकार्यवाह दत्ता होसबळे देखील रविवारपासून नेपाळमध्ये तळ ठोकून आहेत. होसबळे यांना चीन संदर्भातील प्रश्नांबाबत छेडले असता, त्यांनी अतिशय सावध उत्तरे दिली.भारतीय मदत चीनला खुपतेय का, यावर ते म्हणाले, आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून येथे मदतकार्यात सहभागी झालेलो आहोत. काही प्रश्न राजकीय असतात, त्याला राजकीय उत्तरे त्या-त्या वेळी मिळतात. तथापि, भारताचा नेपाळी जनतेच्या मनातील वाढणारा प्रभाव चिनी ड्रॅगनची झोप उडवणारा असल्याचे होसबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले. नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली असून, १२० तास ढिगाऱ्याखालील किशोरवयीन मुलाची सुखरूप सुटका हा एक चमत्कारच मानावा लागेल. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येण्याचीच ही वेळ. काठमांडू शहरात गुरुवारी असाच चमत्कार घडला. १५ वर्षांच्या मुलाला पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पेम्बा लामा असे या मुलाचे नाव आहे.
भारताचे मदतकार्य, चीनसाठी डोकेदुखी!
By admin | Published: May 01, 2015 1:59 AM