संयुक्त राष्ट्रे : गेल्या सत्तर वर्षांत जगभरातील शांती मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक बलिदान भारतीय शांतीसैैनिकांनी दिले आहे. त्यांची संख्या १६३ असून त्यात लष्करी जवान, पोलिस व नागरिकांचा समावेश आहे.संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, १९४८ सालापासून ते आजवर जगभरातील शांती मोहिमांत ३७३७ शांतीरक्षकांनी बलिदान दिले. त्यात भारतातील शांतीरक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांनी हाती घेतलेल्या शांती मोहिमांमध्ये मोठ्या संख्येने आपले पोलीस व लष्करी जवान पाठविणाऱ्या अग्रणी देशांत भारत तिसºया क्रमांकावर आहे. अॅबेई, सायप्रस, काँगो, हैती, लेबनॉन, मध्य पूर्वेतील देश, दक्षिण सुदान, पश्चिम सहारा भाग येथे सध्या सुरु असलेल्या शांती मोहिमांत भारताचे ६६९३ शांतीरक्षक सहभागी झाले आहेत. या शांतीरक्षकांना शस्त्रसज्ज करण्यासाठी तसेच अन्य तयारीपोटी गेल्या ३० एप्रिलपर्यंतची मुदत लक्षात घेतल्यास संयुक्त राष्ट्रांकडून भारताला ९ कोटी २० लाख डॉलर इतकी रक्कम येणे आहे.संयुक्त राष्ट्रांनी शांती मोहिमा सुरु केल्याच्या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली तसेच शांतीरक्षक दिनानिमित्त मंगळवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात शांतीरक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सध्या जगभरात सुरु असलेल्या चौदा शांती मोहिमांमध्ये विविध देशांतील पोलिस व लष्करातील ९६००० हजार जवान सहभागी झाले असून १५ हजार नागरिक या मोहिमांतील कर्मचारी व १६०० जण कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत.संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या वेळी बोलताना सांगितले की, जगभरातील शांती मोहिमांमध्ये गेल्या सत्तर वर्षांत १० लाख पुरुष व महिला सहभागी झाले आहेत. त्यांनी अनेक निरपराधी लोकांचे जीव वाचविले आहेत. २०१७ साली शांती मोहिमांत विविध देशांतील १३७ शांतीरक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता.
जागतिक शांततेसाठी ७० वर्षांत भारतीयांचे सर्वाधिक बलिदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:03 AM