नवी दिल्ली:भारताकडून एक सुपरसॉनिक मिसाईल आपल्या हद्दीत कोसळल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला होता. पाकिस्तानने म्हटले की, भारताकडून आलेल्या मिसाईलने त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि अनेक इमारतींचे नुकसान केले. दरम्यान, भारतानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आल्याचे म्हटले. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, भारतातून एक मिसाईल पाकिस्तानात गेली, पण पाकिस्तानचे हवाई दल त्या मिसाईलवर हल्ला का करू शकले नाही?
भारताने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा पाकचा आरोपपाकिस्तानच्या लष्कराने दावा केला की, क्षेपणास्त्राने भारतातील सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे त्यांना माहित होते आणि काही वेळातच क्षेपणास्त्राने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत स्वतःहून कोसळले.
पाकिस्तानी हवाई दल भारतीय क्षेपणास्त्र का पाडू शकले नाही?नवी दिल्लीतील सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज (CAPS) थिंक टँकचे प्रमुख सेवानिवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी म्हटले की, हे क्षेपणास्त्र ज्या वेगाने पाकिस्तानच्या हद्दीत गेले, त्या वेगाने क्षेपणास्त्र मारण्यासाठी पाकिस्तानला फारसा वेळ मिळाला नाही. इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले की, 'जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने येत असेल, तेव्हा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे तुमच्यासाठी सोपे नसते. त्या मार्गावर क्षेपणास्त्र आहे हेही तुम्हाला माहीत नसते. पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या कोणताही तणाव नसून दोन्ही देशांसाठी हा शांततेचा काळ आहे. ही रेड अलर्ट स्थिती नाही, त्यामुळे पाकिस्तानला क्षेपणास्त्र ओळखून ते पाडता आले नाही. असे असले तरी, जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने येत असते, तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाहीत.'
क्षेपणास्त्र चाचणीबाबत दोन्ही देशांमधील नियम2005 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीबाबत करार झाला होता. करारानुसार, प्रत्येक देशाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीच्या किमान तीन दिवस आधी सूचित करावे लागेल. हा करार सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी लागू आहे मग ते पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र असो किंवा पृष्ठभागावरून समुद्रात मारा करणारे क्षेपणास्त्र असो. करारानुसार, क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण, म्हणजेच ज्या ठिकाणाहून क्षेपणास्त्र सोडले जाणार आहे, ते ठिकाण दोन्ही देशांच्या सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असले पाहिजे. क्षेपणास्त्र नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून 75 किमी अंतरावर सोडले पाहिजे. मात्र, अशी कोणतीही माहिती भारताकडून देण्यात आली नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
इम्रान खान काय म्हणाले?या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही प्रतिक्रिया दिली. रविवारी पंजाबच्या हाफिजाबाद जिल्ह्यात एका रॅलीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, "आम्ही पाकिस्तानमध्ये भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, परंतु आम्ही संयम बाळगला." दरम्यान, भारताने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्यावर पाकिस्तानने म्हटले की, भारताच्या बाजूने तपास पुरेसा नाही आणि दोन्ही देशांची संयुक्त चौकशी झाली पाहिजे.
संयुक्त चौकशीची मागणीभारताच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, क्षेपणास्त्र दुर्घटनेवर भारताच्या प्रतिसादावर ते समाधानी नाहीत. क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडल्याने भारताची अंतर्गत तपासणी पुरेशी नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी संयुक्त तपासाची मागणी पाकिस्तानने केली आहे.