ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 14 - भारताच्या अणू पुरवठादार गटातील समावेशावर म्हणजे एनएसजी सदस्यत्वावर पुन्हा चीनकडून टीका करण्यात आली आहे. यावेळी टीका करताना चीननं पाकिस्तानलाही डागण्या दिल्या आहेत. भारताला एनएसजी सदस्यत्व मिळाल्यास पाकिस्तानच्या दुख-या नस दाबण्याचा प्रकार असून, भारत स्वतःची आण्विक शस्त्रास्त्रे वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याची गरळ पुन्हा चीननं ओकली आहे, असं वृत्त द हिंदू या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
भारताला आण्विक पुरवठादार गटात सदस्यत्व मिळाल्यास चीनच्या राष्ट्रीय हितालाही धोका पोहोचू शकतो, असंही चीनच्या मीडियानं म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आण्विक क्षेत्रात ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जर भारताला एनएसजीचं सदस्यत्व मिळालं तर भारत स्वतःची आण्विक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनसारख्या भारताशेजारील राष्ट्रांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती चीननं दिली आहे.
24 जून रोजी एनएसजीची बैठक होणार आहे. मात्र बैठकीच्या आधीच चीनच्या मीडियानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एनएसजी सदस्यत्व मिळवण्यासाठी अनेक देशांचे दौरे करत आहेत. अमेरिका आणि अन्य काही देशांनीही भारताला एनएसजीचं सदस्यत्व देण्यास अनुकूलता दर्शवल्याचं वृत्त चीनच्या मीडियानं दिलं आहे.