नवी दिल्ली- सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गरिबीच्या निर्देशांकात भारताचे स्थान आता घसरले आहे. अत्यंत गरिब (एक्स्ट्रीम पुअर) लोकांच्या संख्येत आघाडीवर असणाऱ्य़ा भारताची ओळख मे महिन्याच्या शेवटीच बदलली गेली आहे.
नायजेरियामध्ये 8.7 कोटी अत्यंत गरिब लोक आहेत तर भारतात 7. 3 कोटी अत्यंत गरिब लोक राहात आहेत. ब्रुकिंग्जने सादर केलेल्या अहवालानुसार नायजेरियात आता भारतापेक्षा जास्त अत्यंत गरिब वर्गातील लोक आहेत. नायजेरियात अत्यंत गरिब लोकांची संख्या प्रतीमिनिट 6 ने वाढत आहे तर भारतात प्रतीमिनिट 44 लोक अत्यंत गरिब वर्गातून बाहेर पडत आहेत. सध्या भारतातील 5.3 टक्के लोक अत्यंत गरिब वर्गामध्ये राहात आहेत. शाश्वत विकासासाठी भारताने 2013 पर्यंत ठेवलेल्या लक्ष्य़ाच्या अनुसार भारत चांगली प्रगती करत असल्याचे दिसून आले आहे.
अत्यंत गरिब या वर्गाची लोकसंख्या वाढण्यामध्ये आफ्रिकेतील देश आघाडीवर आहेत. अत्यंत गरिब लोक संख्येने जास्त असणाऱ्या पहिल्या 18 देशांमध्ये 14 देश आफ्रिकेतील आहेत. 2018 वर्ष संपेपर्यंत या संख्येत 32 लाख लोकांटी वृद्धी होईल असा अंदाज आहे.नायजेरिया हा तेलाचे उत्पादन करणारा आणि आफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश असला तरी देशांतर्गत विविध प्रश्नांमुळे अनेक आघाड्यांवर देशाला अपयश येत आहे. कुपोषण आणि गरिबीच्या समस्येला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यात नायजेरिया असमर्थ ठरत आहे.