ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. १३ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आरोप निराधार असून पाकिस्तानने दहशतवादाला कधीच पाठिंबा दिलेला नाही असे प्रत्युत्तर पाकिस्तानने दिले आहे. दहशतवादाचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसला आहे असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी काश्मीर दौ-यात पाकवर टीका केली होती. पाकची समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नसल्याने ते दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध लढतात असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानावर बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. 'भारताचे पंतप्रधान मोदींचे आरोप हे निराधार असून पाकने दहशतवादाला पाठिंबा दिलेला नाही. याऊलट पाकिस्तानने आत्तापर्यंत विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तब्बल ५५ हजार नागरिकांना गमावले आहे. तसेच ५ हजार जवान शहीद झाले' असे पाकने म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्य सीमा रेषेची सुरक्षा करण्यास सक्षम असून ते आगळीक करण्याची धमकी देणा-यांना चोख प्रत्युत्तर देतील असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पाकिस्तानचे नेते शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करत असताना भारताने असे आरोप करणे अनपेक्षीत आहे. आरोपप्रत्यारोप करण्याऐवजी दोन्ही राष्ट्रांनी वादग्रस्त प्रश्नांवर चर्चेद्वारे तोडगा काढणे गरजेचे आहे असा पाकच्या परराष्ट्र मंत्रायलयाने स्पष्ट केले.