जनकपूर, नेपाळ-भारत बॉर्डर : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण जग मानवतेच्या भावनेतून कार्यरत असताना भारतविरोधी शक्ती मात्र यातून काय साधता येईल, हे शोधण्यात गुंतलेल्या आहेत. ही संधी साधून गेला मोठा काळ नेपाळमध्ये असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या भूकंपामुळे भारताला घुसखोरीच्या नव्या धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि भारतीय दृष्टिकोनातून नेपाळकडे पाहणारे काही ज्येष्ठ लोक नेपाळमध्ये वास्तव्यास आहेत. आपण शेअर करीत असलेली माहिती महत्त्वाची असून आमचे नाव छापू नका, असे त्यांनी ‘लोकमत’ला आवर्जून सांगितले. भारतीय सुरक्षेसाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.पाकिस्तानातून पूर्ण क्षमतेने विमाने भरून काठमांडूत येतात, परतताना मात्र त्यात अवघे १०-१५ प्रवासी असतात. पाकिस्तानी काठमांडूमध्ये थांबून पुढे नेपाळ-भारत सीमेवर येऊन स्थायिक होतात. नेपाळ-भारत संपूर्ण सीमा १,७४५ किलोमीटरची आहे. तर रस्त्याला लागून असलेली सीमा १,१०० किलोमीटर आहे. नेपाळमधून ७४ लहान-मोठ्या नद्या भारतात येतात. त्यामुळे संपूर्ण सीमेवर तारांचे कुंपण उभारणे अशक्य आहे. त्यात आता भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात मदत साहित्य घेऊन वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये असलेले आणि सीमा क्षेत्रात असलेले पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.
भूकंपानंतर भारताला घुसखोरीचा धोका
By admin | Published: May 04, 2015 2:31 AM