वॉशिंग्टन, दि. 23 - पाकिस्तान भारताचे कारण पुढे करुन दहशतवादाला खतपाणी घालत आहे असा आरोप ट्रम्प प्रशासनातील अधिका-याने केला आहे. भारत अफगाणिस्तानात जे काम करतोय त्याने पाकिस्तानला कुठलाही धोका नाही. भारताने अफगाणिस्तानात लष्करी तळ उभारलेले नाहीत किंवा सैन्य तुकडयांची तैनाती केलेली नाही असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते मायकल अॅनटॉन यांनी सांगितले.
पाकिस्तान फक्त भारताचे कारण देतोय असे अॅनटॉन म्हणाले. पाकिस्तान सरकार दहशतवादाला पाठिंबा देण्यामध्ये सक्रीय असून ते दोषी आहेत असे अॅनटॉन म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियासाठीचे आपले धोरण जाहीर केले. अफगाणिस्तानच्या विकासामध्ये भारताने अधिक सक्रीय व्हावे अशी इच्छा व्यक्त करताना ट्रम्प यांनी दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्यावरुन पाकिस्तानला चांगलेच फटकारले.
अफगाणिस्तानातून माघार घेणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धारसर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, जर त्यांनी अतिरेक्यांची मदत सुरूच ठेवली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. युद्धग्रस्त अफगाणिस्तानात शांतता स्थापन करण्यासाठी भारताने आणखी सहकार्य करावे, असेही आवाहन ट्रम्प यांनी केले.
अफगाणिस्तानात स्थिरता आणण्यासाठी भारताने दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली, पण भारत अमेरिकेकडून व्यापारात अब्जावधी डॉलर कमावतो. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की, भारताने आर्थिक सहकार्यात मदत वाढवावी. वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांचा द्विपक्षीय व्यापार २०१६ मध्ये वाढून ११४ अब्ज डॉलर झाला आहे. हा व्यवहार २०१४ मध्ये १०४ अब्ज डॉलर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी मागील वर्षी संयुक्तपणे हेरात प्रांतात एका ऐतिहासिक प्रकल्पाचे उद्घान केले होते. भारताची ही १७०० कोटींची योजना आहे.
अफगाण राजदूतांनी केले स्वागतअमेरिकेने घेतलेल्या भूमिकेचे अफगाणिस्तानच्या वॉशिंग्टनमधील दूतावासाने स्वागत केले आहे. अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला ट्रम्प यांनी गंभीर परिणामांचा इशारा दिल्याबद्दल, राजदूत हमदुल्ला मोहिब यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.