'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:02 PM2024-08-23T20:02:18+5:302024-08-23T20:02:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.

'India's role in the war was never neutral', PM Narendra Modi assured to Volodymyr Zelensky | 'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन

'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन

PM Modi Meets Volodymyr Zelensky: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी(दि.23) राजधानी कीव येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाबाबत पीएम मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'युद्धाबाबत भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत,' असे पीएम मोदी स्पष्टपणे म्हणाले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला.

युद्धाने प्रश्न सुटत नाही
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट झाली. रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेबाबत बोलताना मोदी म्हणाले की, युद्धाची भीषणता मन दुखावणारी असते. युद्ध लहान मुलांसाठी विनाशकारी आहे. युद्ध आणि हिंसाचार, हा समस्येवरचा उपाय नाही. संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच या प्रदेशात स्थिरता सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रिय भूमिका बजावेल.

झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधताना पीएम मोदी म्हणाले की, आम्ही पहिल्या दिवसापासून शांततेच्या बाजूने आहोत. आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो आहोत. बुद्धाच्या भूमित युद्धाला जागा नाही. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या भूमीतून आम्ही आलो आहोत. युक्रेनमध्ये शांतता नांदावी, अशी भारताची इच्छा आहे. भारत नेहमीच युक्रेनच्या पाठीशी उभा राहील. मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले. 

भारत-युक्रेनमध्ये चार करार 
भारत आणि युक्रेनने चार महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही देशांनी मानवतावादी मदत, कृषी, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यामुळे रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: 'India's role in the war was never neutral', PM Narendra Modi assured to Volodymyr Zelensky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.