इस्लामाबाद : भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून ‘आक्रमण’ केले आहे आणि त्याला उत्तर देण्याचा पाकिस्तानला हक्क आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले. पाकिस्तानच्या बाजूकडील नियंत्रण रेषा मंगळवारी पहाटे ओलांडून भारतीय हवाई दलाने अनेक ठिकाणचे दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट केल्यानंतर कुरेशी यांनी वरील भाष्य केले.
भारताच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान इम्रान खान होते. कुरेशी म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर आज आक्रमण केले आहे.
या बैठकीची थोडक्यात माहिती परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी नंतर पंतप्रधान इम्रान खान यांना दिली. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या लष्कराने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेचे भारतीय हवाई दलाने उल्लंघन केल्याचा आरोप केला. भारतीय विमानाने मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी केली. त्याला पाकिस्तानच्या हवाई दलाने योग्य वेळी व परिणामकारक उत्तर दिले. त्यावेळी तेथून पळून जाताना त्याने घाईघाईत बालाकोटजवळ बॉम्ब टाकला. कोणतीही जीवितहानी झाली नाही की नुकसान, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक व मेजर जनरल असिफ गफूर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने ताबडतोब कारवाई करताच भारतीय विमान परत गेले, असे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)सिनेटर व पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या नेत्या शेरी रहमान म्हणाल्या की, नियंत्रण रेषा ओलांडून भारताने केलेले आक्रमण हे व्यूहरचनेच्या दृष्टीने चुकीचे आणि डावपेचाच्या संदर्भात निरर्थक आहे. अशा चाली या फक्त संताप निर्माण झालेल्या विभागात तणाव निर्माण करतात. हे उघडच आहे की भारतातील सत्ताधारी पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा काही मार्ग दिसत नसल्यामुळे तो युद्धाला आतुर झाला आहे, असे रहमान यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारत सरकारने देशांतर्गतच्या दबावामुळे लाक्षणिक घुसखोरी केली आहे, असे म्हटले.