इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. भारताच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता असून, त्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी मांडली होती. त्याबद्दल पाकिस्तानने म्हटले आहे की, अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडू शकतात. काश्मीरमध्ये भारताकडून सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली होत असून, त्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने टीका केली आहे. त्यामुळे हताश झालेला भारत बेजबाबदार वक्तव्ये करीत आहे.पाकिस्तानने सांगितले की, भारत काश्मीरमधील निरपराध लोकांचा छळ करीत असून, त्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. दुसऱ्यांना दुषणे देण्यापेक्षा भारताने काश्मीरमधील निर्बंध हटवावेत, आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणे थांबवावे, तसेच जम्मू-काश्मीर प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी भारताने करावी. (वृत्तसंस्था)>भारताची ठाम भूमिकाकाश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे निर्णय केंद्र सरकारने घेतले.या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उघडली. त्याशिवाय भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत पाठविले, राजनैतिक संबंध कमी केले. तरीही पाकिस्तानच्या कांगाव्याला जगभरातून पाठिंबा मिळाला नाही.काश्मीरचा प्रश्न भारत व चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशीच भूमिका हे देश व संयुक्त राष्ट्रांनी घेतल्याने पाकिस्तान आणखी बिथरला आहे.३७० कलम रद्द करणे हा आमचा अंतर्गत मामला आहे व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.
पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 6:08 AM