काठमांडू : मला पदच्युत करण्याच्या विरोधकांनी सुरू केलेल्या कारस्थानास भारताकडून चिथावणी दिली जात आहे, असा आरोप नेपाळचे पंतप्रधान ओ. पी. ओली यांनी केला आहे.
सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील बंडाळीने पद डळमळीत झाल्याची जाणीव झाल्यावर ओली यांनी हा आरोप केला. कालापानी, लिपुलेख व लिंपियाधुरा हे भारताचे तीन प्रदेश नेपाळमध्ये समाविष्ट करणारा नेपाळचा नवा नकाशा व त्यासाठीची घटनादुरुस्ती संसदेकडून मंजूर करून घेतल्यानंतर भारत-नेपाळ संबंध ताणले गेल्याचा संबंध ओली यांनी या कटाशी जोडला.
काठमांडूत एका कार्यक्रमात बोलताना ओली म्हणाले की, नेपाळने नवा नकाशा मंजूर केल्यानंतर दिल्लीतील माध्यमांमध्ये व तेथील बुद्धिवंतांमध्ये सुरू झालेली चर्चा, नेपाळमधील भारतीय वकिलातीत वाढलेल्या हालचाली व काठमांडूच्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये होत असलेल्या बैठका पाहता भारताच्या चिथावणीने विरोधक मला पदच्युत करण्याचा कट रचत आहेत, हे अगदी सहजपणे लक्षात येते.राष्ट्रवादी पवित्रा घेत ओली म्हणाले की, बाहेरच्यांच्या उचापतींमुळे सरकार पडायला नेपाळी राष्ट्रवाद एवढा लेचापेचा नाही.