नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नुकतेच अण्वस्त्रांच्या वापराबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा पाकिस्तानने विपर्यास केला असून ही भारताकडून आलेली धमकी असल्याचे ट्वीट पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केले आहे.
1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. यामुळे वाजपेयींना राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये श्रद्धांजली वाहिली. यावेऴी बोलताना त्यांनी भारताने कधीही पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर केलेला नाही. पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर निर्भर आहे, असे म्हटले होते.
गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे.
मात्र काश्मीरमधून कलम 370 हटविण्यावरुन पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढलेला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाला धमकी देणारं ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय की, हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल. त्यामुळे दोन्ही देशातील वाढता तणाव लक्षात घेता संरक्षण मंत्र्यांनी केलेले हे विधान महत्वाचे आहे.