संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) जागतिक मुस्लिम समुदाय परिषदेने भारतीयइस्लामवर 'धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि समकालीन परंपरा: इस्लामचेभारतीयीकरण' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकात इस्लामच्या प्रादेशिक स्वरूपांवर जोर देण्याचे आणि इस्लामच्या एका रुपाला न मानण्याबद्दल सांगितलं आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार या पुस्तकात इस्लामच्या खऱ्या प्रतिनिधीत्वाच्या रुपात सादर केल्या जात असलेल्या धर्माच्या 'अरबीकरणा’वर चर्चा करण्यात आली आहे.
“अरब संस्कृतीला इस्लामच्या रुपात रोत्साहन देण्यात आणि इस्लामच्या केवळ एकाच प्रकाराला स्वीकारण्यात अनेक अडचणी आहेत,” असे मत मुस्लिम परिषदेचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अब्बास पनक्कल यांनी व्यक्त केलं. या पुस्तकात ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, वँकोवरचे डॉ. सबेस्टिअन आर प्रांज, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे डॉ. मोइन अहमद निजामी आणि नालसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबादचे डॉ. फैजान मुस्तफा यांच्या लेखांचा समावेश आहे.
भारतीय इस्लामचं मॉडेल उत्तम उदाहरण ठरू शकतं - मुस्लिम परिषदडॉ. सेबॅस्टियन आर. प्रांज यांनी या पुस्तकात 'मान्सून इस्लाम' हा शब्दप्रयोग केला आहे. हा शब्द इस्लाम या धर्मातील विविधता दर्शवतो. त्यांनी मान्सूनच्या वाऱ्यांची दिशेनंतर दक्षिण आशियामध्ये प्रवास करणाऱ्या अरब व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन हा शब्दप्रयोग केला आहे. इस्लामचा प्रचार करणारे ते सामान्य अरब व्यापारी ना कोणत्या सरकारचे प्रतिनिधी होते, ना ते मान्यता असलेले धार्मिक अधिकारी होते. त्या व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्कृती आत्मसात करून बाहेर इस्लामचा प्रसार केला. या इस्लाममध्ये धर्माचा गाभा जसा आहे तसाच ठेवला गेला, असं प्रांज यांनी म्हटलं आहे. मलबार किनार्यावरील मशिदी हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यकलेच्या संमिश्रणाची जिवंत उदाहरणे आहेत, असंही ते म्हणतात. त्यांनी आपल्या पुस्तकात दक्षिण भारतातील काही मंदिरांमध्ये हिंदु आणि मुस्लिमांद्वारे पूजा केली जाण्याचाही उल्लेख केला आहे.
“मुस्लिम शासकांनी मंदिरांना अनुदान देत, गोहत्या बंदी करत आणि हिंदूंना महत्त्वाच्या पदांवर ठेवून सांस्कृतिक परस्परसंवादाला चालना दिली. ऐतिहासिक पुस्तक चचनामानुसार मुस्लिमांनी ख्रिश्चन आणि यहुदींप्रमाणे हिंदूंनाही आपलंसं केलं,” असं आपल्या लेखात डॉ. मुस्तफा यांनी म्हटलं आहे. काही मुस्लिम शासकांनी आपल्या शिक्क्यांवर देवी लक्ष्मी आणि नंदीची आकृतीही साकारली होती, असंही त्यांनी लिहिलं आहे. भारतीय इस्लाम मॉडेल जगभरातील अनेक मुस्लिम समुदायांसाठी एक चांगल्या उदाहरणाच्या रुपात काम करू शकतो, असं अबू धाबी स्थित मुस्लिम परिषदेचं म्हणणं आहे.