नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने घेरल्याने खवळलेल्या पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत फॅसिस्टवादाला खतपाणी घातले जात असल्याची टीका केली. पाकिस्तानचे राजदूत साद वराईच यांनी हे आरोप केले आहेत.
भारताने आज राईट टू रिप्लाय पर्यायाचा वापर करून पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा आरोपाचे खंडन करत प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानच्या दहशतवादावर कडवी टीका केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने आज राईट टू रिप्लायचा मार्ग निवडत सत्ताधारी भाजपच्या मुळावरच घाव घातला आहे.
आरएसएस पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांसाठी फूस लावत असून ही संघटना फॅसिस्टवादाचे केंद्र आहे. तसेच भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदूत्ववादी आहेत. जे उघडपणे हिदुत्ववादाला प्रोत्साहित करत आहेत. यामुळे भारतातील अल्पसंख्यांक समाजावर म्हणजेच ख्रिश्चन, मुस्लिमांवर हिंदूंकडून ठेचून मारण्यासारखे जमावाचे क्रूर हल्ले होत आहेत. या घटनांचे आदित्यनाथ समर्थन करत आहेत.
तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता साद यांनी आसाममध्ये राहत असलेले बंगाली नागरिक अचानक बेघर करण्यात आले आहे. आणि भारताचे एक वरिष्ठ पदावरील नेता त्यांना वाळवी असलल्याचे संबोधत असल्याचा आरोप केला. ज्यांच्या देशामध्ये मशिदी, चर्च जाळले जातात त्यांना दुसऱ्यांबद्दल काही बोलायचा अधिकार नसल्याचेही साद यांनी म्हटले.