लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्त घालण्याबाबत चीनशी एक करार केल्याची घोषणा भारताने सोमवारी केली आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे.
रशियामध्ये या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात उद्या, मंगळवारी किंवा बुधवारी चर्चा होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर ही कराराची घटना महत्त्वाची मानली जात आहे.
दोन्ही देश पुढचे पाऊलही उचलणार
- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत व चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासंदर्भात झालेला करार ही महत्वाची घटना आहे. आता दोन्ही देश पुढचे पाऊलही उचलणार आहेत. - संयम राखून ज्या राजनैतिक हालचाली केल्या त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. पूर्व लडाखच्या सीमेवर २०२० साली शांतता होती. तशीच स्थिती पुन्हा निर्माण होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.