पापुआ - इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जयपुरा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. पूर आणि भूस्खलनामुळे 116 जण जखमी झाले असून त्यातील 41 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. पूरामुळे अनेक जिल्ह्यांना फटका या आपत्तीमध्ये मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचं अधिका-यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी जयपूरा जिल्ह्यातील अनेक गावांना पूराचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून जयपुरा भागात पावसाला सुरुवात झाली होती. या परिसारतील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांना पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते पुर्वी नुग्रोहो यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पुरामध्ये बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम करत आहे. आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. पूरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पूरातील पाण्याची पातळी कमी होत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचं मोठं आव्हान आमच्या समोर आहे. पूरामुळे अनेक भागात घरं पडली आहेत, झाडं कोसळली आहेत, रस्त्यावर चिखल झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे.
स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, नदीच्या किनारी असलेल्या उंच भागांमध्ये भूस्खलन झालं आहे, भूस्खलनामुळे नदीपात्रात माती जमा होऊन पाण्याचा प्रवाह रोखला गेला त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. इंडोनेशियामध्ये साधारणपणे ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान अशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात सुलावेसी बेटावर पूर आणि भूस्खलनामुळे 70 लोकांचा मृत्यू झाला होता.
इंडोनेशियामधील बचाव कार्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूस्खलनामुळे एकाचा घराचा भाग कोसळला, या मलब्याखाली अडकलेल्या एका चिमुकल्याला वाचविण्यात आम्हाला यश आले. पाच महिन्याच्या या चिमुकल्याला त्याच्या वडिलांकडे सुखरुप देण्यात आलं. इंडोनेशिया येथे यापूर्वीही अनेक नैसर्गिक संकटे आली होती. या संकटामुळे येथे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.