इंडोनेशियामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना तेथील स्थानिक लोकांनी बोटीतून खालीही उतरू दिले नाही. लाकडाच्या बोटीतून आलेले 140 रोहिंग्या मुस्लीम इंडोनेशियाच्या उत्तरेकडील प्रांत आचेच्या किनाऱ्यापासून साधारणपणे 1 मैल (0.60 किलोमीटर) दूर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यात अधिकांश महिला आणि मुलांचा समावेश होता.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील कॉक्स बाजारातून दक्षिण आचे जिल्ह्यातील लाबुहान हाजीच्या किनाऱ्यापर्यंत जवळपास दोन आठवड्यांच्या प्रवासादरम्यान तीन रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी 11 रोहिंग्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.
"आम्हाला येथे शांतता हवी आहे" -दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी म्हटले आहे, "आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येते उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली." याशिवाय, बंदरावर लटकलेल्या एका मोठ्या बॅनरवर लिहिले होते की, “या प्रदेशात रोहिंग्या निर्वासितांच्या आगमनाला दक्षिण आचे रीजेंसीच्या लोकांचा विरोध आहे."
आचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुस्लिमांचा हा समूह 9 ऑक्टोबरला कॉक्स बाजारातून रवाना झाला होता. त्यांना मलेशियात जायचे होते. जबल यांनी म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांनी रोहिंग्या समूहाला भोजन दिले. याशिवाय, या निर्वासितांना संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनीही भोजन उपलब्ध करून दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट बांगलादेशातून निघाली तेव्हा तिच्यावर 216 लोक होते. यांपैकी 50 लोक इंडोनेशियातील रियाउ प्रांतात उतरले होते. यातच, आचे पोलिसांनी कथितपणे लोकांच्या तस्करीसंदर्भात तीन संशयितांना अटक केली आहे.