जयपुरा (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानातील ५४ जणांपैकी कोणीही वाचण्याची शक्यता नाही. दरम्यान, विमानात ४,७०,००० अमेरिकन डॉलर (६.५ अब्ज इंडोनेशियन रुपये) होते, असे टपाल खात्याच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. इंडोनेशियाचे ट्रिगना एअर सर्व्हिस एटीआर ४२-३०० विमान रविवारी उत्तर इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतातील डोंगराळ भागात कोसळले व त्यात ४९ प्रवासी व ५ कर्मचारी अशा ५४ जणांचा मृत्यू झाला. हे विमान जयपुराच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागातील ओकसबिल या डोंगराळ वसाहतीकडे निघाले होते. बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. ४,७०,००० अमेरिकन डॉलरची रक्कम त्या भागातील गरजू कुटुंबांना वाटण्यासाठी नेण्यात येत होती. नियोजित स्थळी पोहोचण्यापूर्वी १० मिनिटे आधी विमान बेपत्ता झाले. त्याआधी चालकाने दाट ढगांतून उतरण्याची परवानगी मागितली होती. तत्पूर्वी, शोध आणि बचाव पथकाने बिनतांग घनदाट जंगलाच्या डोंगराळ जिल्ह्यात विमानाचे अवशेष बघितले. ते बहुधा याच अपघातग्रस्त विमानाचे असावेत, असे स्थानिक पोलीस प्रमुख युनुस वॅली यांनी अंतरा वृत्तसंस्थेला सांगितले. (वृत्तसंस्था)
इंडोनेशियन विमानात होता अमाप पैैसा
By admin | Published: August 17, 2015 11:41 PM