सोराँग, इंडोनेशिया-इंडोनेशियामध्ये एका गावातील संतप्त जमावाने 300 मगरींना ठार मारण्याची घटना घडली आहे. गावातील एका व्यक्तीचा मगरीने प्राण घेतल्यानंतर गावकऱ्यांनी संतापाने परिसरातील सर्व मगरींना ठार मारुन टाकले.शनिवारी इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतामध्ये गुरे चरायला गेलेल्या एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला. त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर संतप्त जमावाने एकापाठोपाठ एक मगर मारायला सुरुवात केली.
सुगितो असे या 48 वर्षिय व्यक्तीचे नाव आहे. रहिवासी क्षेत्रामध्ये क्रोकोडाईल फार्म तायर करण्याला नागरिकांचा आधीपासूनच विरोध होता. सुगितोच्या मृत्यूमुळे त्यांचा राग आणखीच वाढीला लागला. बास्सार मानुलँग या स्थानिक वन्यजीव संस्थेने सुगितो च्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे कबूल केले होते व सांत्वनपर निरोपही पाठवला होता. मात्र सुगितोच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडो आले होते, त्यांचे समाधान न झाल्यामुऴे त्यांनी चाकू, फावडे, सुरे घेऊन मगरींना मारायला सुरुवात केली. चार इंचाच्या पिलापासून 2 मीटरच्या पूर्ण प्रौढ मगरींनाही त्यांनी ठार मारले.
संतप्त जमावासमोर पोलिसांना काहीही करता आले नाही. इंडोनेशियात मगरींनी माणसावर हल्ला करण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मार्च महिन्यामध्ये पामच्या मळ्यात काम करणाऱ्या एका कामगारावर मगरींनी हल्ला करुन त्याला मारल्यानंतरही एका सहा मीटर लांब मगरीला मारण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी एका रशियन पर्यटकाचे मगरीने राजा अंपाट बेटावर प्राण घेतले होते.