कॅनबेरा : आॅस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बार्नबी जॉयस यांच्यासह संसदेच्या चार सदस्यांना उच्च न्यायालयाने दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अपात्र ठरविल्याने अवघ्या एका मताचे बहुमत असलेले माल्कम टर्नबुल यांचे आघाडी सरकार सत्तेवरून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आॅस्ट्रेलियाच्या राज्यघटनेनुसार गेली ११६ वर्षे दुहेरी नागरिकत्व असलेली व्यक्ती संसदेची सदस्य राहण्यास अपात्र आहे. उपपंतप्रधान जॉयस यांनी त्यांना वडिलांकडून जन्माने मिळालेल्या न्यू झीलंडच्या नागरिकत्वाचा त्याग न करता संसदेची निवडणूक लढविली होती. आता त्यांनी ते नागरिकत्व सोडून दिले असल्याने ते त्याच मतदारसंघातून पुन्हा संसदेची निवडणूक लढवू शकतात. मात्र त्यांना पराभूत करून विरोधी मजूर पक्ष टर्नबूल यांचे सरकार त्याआधारे सत्तेवरून खाली खेचू शकेल.दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर एकूण सहा सेनेट सदस्यांच्या सदस्यत्वास न्यायालयात आव्हान दिले गेले होते. त्यापैकी उपपंतप्रधान बार्नबी व आणखी एक मंत्री फिओना नॅश यांच्यासह चार सिनेट सदस्यांना अपात्र ठरविले गेले. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 2:41 AM