इस्लामाबाद - पाकिस्तानमध्येमहागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात महाग झाल्या आहेत. गेल्या 12 वर्षांतील महागाईचा रेकॉर्ड इम्रान खान सरकारच्या काळात तुटला असून गव्हाचं पीठ, साखर यांचे भाव गगनाला भिडले आहेत. देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच इम्रान खान यांनी ट्विटद्वारे लवकरच खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात येतील, सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय.
पाकिस्तानमधील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने इम्रान खान यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. त्यानुसार, इम्रान खान यांना लोकांच्या रागाची कल्पना आहे, त्यासाठीच मंगळवारी कॅबिनेट बैठकीत खाद्य पदार्थांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, सरकारी संस्थांनी साखर आणि गहू यांच्या वाढलेल्या दरांची चौकशी करण्यास सुरुवात केली असून जे दरवाढीशी संबंधित आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही खान यांनी सांगितलंय.
पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथे गव्हाचे पीठ 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल आहे. त्यामुळे एका चपाती/भाकरीची किंमत 15 रुपये बनली आहे. तर, साखर 80 रुपये किलो झाली असून तिची निर्यात न थांबविल्यास साखर प्रति किलो 100 रुपये असा दर गाठू शकते. दरम्यान, ट्रान्सपोर्टर यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनामुळे या किंमती वाढल्याचं सांगितलं जातंय.